कोर्लई,ता.27 (राजीव नेवासेकर) मुरुड तालुका पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या माध्यमातुन साळाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील साळाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत "जल अर्पण दिवस" साजरा करण्यात आला.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन पाण्याची टाकी येथे विधिवत कलश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पाणी आडवा, पाणी जिरवा”, “जल है तो कल है”, “पाणी हेच जीवन” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, याबरोबरच जनजागृतीही करण्यात आली.
यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी जल संकल्प / जल शपथ घेऊन पाण्याचे संवर्धन व योग्य वापर करण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमा दरम्यान पाण्याची गुणवत्ता तपासणी प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ,सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील,उपअभियंता एकनाथ कोठेकर,जिल्हा परिषद सदस्या ज्योती रमेश नागावकर,विस्तार अधिकारी प्रसाद माळी,विस्तार अधिकारी वसंत दळवी,सरपंच वैभव कांबळी,ग्रामपंचायत अधिकारी आशा बिरवाडकर, सदस्य,कनिष्ठ अभियंता प्रमोद यादव,BRC श्रेया गद्रे, रा.जि.प.शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या