कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजा भोईर,उपाध्यक्ष केतन नाक्ती,निखिल मानाजी योगेंद्र गोयजी,प्रथमेश म्हात्रे, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा धुमाळ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा उद्देश व खेळाचे महत्व पटवून दिले.क्रीडास्पर्धा प्रमुख चेतन चव्हाण यांनी खेळाडूंना शपथ देऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कबड्डीपटू मिथून भोईर व संदीप कोटकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.यास्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक तसेच खो-खो,कबड्डी व डाॅजबाॅल अशा सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपले क्रीडाकौशल्य दाखविले. सांघिक खेळांमध्ये विविध संघांनी चांगली लढत दिली तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग नोंदविला. विजेत्या विद्यार्थ्यांना व संघांना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या क्रीडास्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम,शिस्त व संघ भावना वाढीस लागण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब फुंदे,संतोष दहातोंडे,स्वप्नाली बाजी,हर्ष नांदगावकर व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालकवर्गाने परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या