Type Here to Get Search Results !

जिविता पाटील यांना LLM पदव्युत्तर पदवीपरीक्षेत प्रथम श्रेणी



कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)नवीन पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ  प्राचार्या डॉ.सानवी देशमुख, सहप्राचार्या डॉ.धनश्री कदम, प्रोफेसर डॉ.ममता भट्टाचार्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (एल.एल. एम) घेत असणाऱ्या अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी एलएलएम. (मास्टर ऑफ लॉ) या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले असून संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांमधून एलएलएम. ही  पदव्युत्तर पदवी घेणारी पहिली अंगणवाडी सेविका होण्याचा बहुमान मिळाला असून त्यांच्यावर महाराष्ट्रातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ! 

     वयाच्या २१ व्या वर्षी पदरात १ वर्षाचे एक मूल असताना विधवापण वाट्याला आल्यानंतर जिविता पाटील यांनी खचून न जाता आपले अर्धवट राहिलेले शिक्षण सासू मनोरमा पाटील यांच्या सहकाऱ्याने आणि पाठिंब्याने सुरू केले. दरम्यान मुलाची जबाबदारी, कठीण प्रसंग, शिक्षण आणि बिकट आर्थिक परिस्थिती या सर्वांवर मात करीत भाजी विकण्यापासून ते पतसंस्थांमध्ये खाती गोळा करण्याचे मिळेल ते काम हातात घेतले आणि जबाबदारी व शिक्षण सुरू ठेवले. उत्तरोत्तर शिक्षणात यश मिळत असताना जिद्ध आणि चिकाटी न सोडता  एम.ए.बी.एड, एमए. एज्युकेशन हे पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २०११ साली एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. मुळातच समाजकार्याची आवड असल्याकारणाने अंगणवाडी सेविका या पदाचा आदर करीत अविरतपणे सेवा करताना अनेकांना सहकार्य केले, मार्गदर्शन केले, बचतगट स्थापन केले, सुरुवातीला एस.ओ.एस. संस्था, बालग्राम अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करीत असताना महिला व मुलांच्या संपर्कात अधिक कार्य केले. त्याच दरम्यात त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघर येथून प्राध्यापिका स्मिता वारघडे तसेच कोएसो.लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय पेझारी प्राचार्य मारोती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यु ही पदव्युत्तर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. ज्येष्ठ पद्मश्री पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ यांच्या संपर्कात आल्याने आणि त्यांचे वरदहस्त लाभल्याने त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचा आदर्श समोर ठेवला व आयुष्यात मागे वळून न पाहता समाजकार्य सुरू ठेवले. पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून जबाबदारी आणि एकल महिला म्हणून संघर्ष वाट्याला आले तरी खंबीरपणे तोंड देत समस्त एकल महिलांसाठी त्या आदर्श ठरल्या. 

    जिविता पाटील यांना काही ठिकाणी काम करीत असताना आलेल्या अनुभवातून अंगणवाडी सेविका म्हणून आजही समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नसल्याची खंत वाटते. त्यांच्या परिस्थितीची जाणीव नसणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षणाची कल्पना नसणाऱ्या व एक अंगणवाडी सेविका म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहींचा वेगळा जाणवत असला तरी  या सर्वांकडे दुर्लक्ष करून त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरविले आणि अथक मेहनत घेऊन त्यांनी कोएसो.ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे एलएलबीचे तीन वर्षाचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास आणखी खोलवर करता यावा यासाठी मास्टर ऑफ लॉ करण्याचा निर्णय घेतला आणि सीईटी परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी बिसीटी. कॉलेज ऑफ लॉ न्यू पनवेल येथे एलएलएम या दोन वर्षे कालावधीच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासासाठी प्रवेश मिळविला आणि दोन वर्षाचा अभ्यासक्रम सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या त्या डिप्लोमा इन कौन्सिलिंगचा अभ्यास करीत आहेत. नुकताच जाहीर झालेल्या निकालात जिविता पाटील यांनी पुन्हा एकदा एलएलएम या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर