कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या नांदगावच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही
भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पहाटे दिड वाजता मंदिराचे पुजारी महेश जोशी, शैलेश जोशी व त्यांचे सहकारी यांनी श्रींची शोडषोपचारे पूजा केली त्यानंतर चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट तर्फे पूजा करण्यात आली तर पूजेनंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.यावेळी पुजेचा मान सौ.दिपाली व चेतन देशपांडे यांना मिळाला.
पहाटे थंडीच्या कडाक्यामुळे,मधला वार असूनही दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठे सहकार्य केले.
नांदगावमधील मुख्य रस्त्यांवर सतत जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे यात्रेमुळे वाहतुकीत अडथळा
निर्माण होत होता.वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागत होते.
सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत हभप श्रेयस बडवे (पुणे)यांनी जन्मोत्सवाचा सोहळा पार पाडला.चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्टच्या भगिनींनी पाळणा गीत सादर केले.त्यानंतर श्रींच्या मुर्तीचे दर्शन भक्तांना घडविण्यात आले.सकाळी, सायंकाळी स्थानिक भजनी मंडळींची सुस्वर भजने व रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान येथे भरलेल्या जत्रेत विविध प्रकारची मिठाई,पेढे,बर्फी,खेळणी,हार,फुले,नारळ,भजी,वडे, मिसळ,पाव व अन्य गृहोपयोगी वस्तूंची दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आली होती.मात्र परंतु प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे भक्तांना खरेदीसाठी हात आखडता घ्यावा लागला.जत्रेला मोठी गर्दी उसळली होती./

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या