Type Here to Get Search Results !

मुरुड आगाराच्या भंगार गाड्यातून प्रवास : प्रवाशांची सुरक्षा वा-यावर


कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)गेल्या काही दिवसांपासून मुरुड आगाराच्या एस.टी.गाड्यातून प्रवासात गाड्या अचानक रस्त्यात बंद पडणे, ब्रेक डाऊन होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे बोलले जात असून प्रवाशांना वेळप्रसंगी भंगार गाड्यातून प्रवास करावा लागत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आगाराला सुस्थितीतील व नवीन गाड्या देण्यात वंचित तर ठेवले जात नाही ना ? असा संशय सामाजिक कार्यकर्ते ॲड.मनीष माळी यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण येथून मुरुडकडे सुटलेली मुरुड डेपोची एसटी बस अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसच्या दुरवस्थेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बसची अवस्था पाहता ती रस्त्यावर धावण्यायोग्य आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत असून, अशा गाड्या बिनधास्तपणे प्रवाशांच्या जीवाशी खेळत रस्त्यावर कशा पाठवल्या जातात, असा संतप्त सवाल ॲड .मनिष माळी यांनी केला आहे. “अधिकाऱ्यांना लोकांच्या जिवाचे काहीच वाटत नाही का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

ॲड.मनिष माळी पुढे म्हणाले की, “अशा जीर्ण आणि असुरक्षित गाड्या प्रवाशांच्या सेवेत पाठवणे म्हणजे लोकांवर सूड उगवण्यासारखे आहे. मुरुड आगाराला नवीन बस मिळणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात आजही मुरुड आगार नवीन गाड्यांपासून वंचितच आहे.”

विशेष म्हणजे, सीएनजी पंपच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधित पक्ष, यंत्रणा व विभागांनी या गाड्यांच्या दयनीय अवस्थेचा गांभीर्याने विचार करून प्राधान्यक्रमाने मागणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकारामुळे ग्रामीण आणि तालुकास्तरावरील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, एसटी महामंडळाने तातडीने या गाड्यांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच मुरुड आगाराला नवीन आणि सुरक्षित गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी व विविध संघटनांकडून होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासन या गंभीर विषयाकडे कधी लक्ष देणार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला कधी प्राधान्य देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर