Type Here to Get Search Results !

मुरुड आगाराच्या कारभारा बाबत तीव्र नाराजी लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) राज्य परिवहन महामंडळाच्या मुरुड आगाराच्या एस.टी.गाड्या काही ना काही कारणाने रस्त्यावर बंद पडण्याच्या प्रकारात अनेक दिवसांपासून वाढ झाली असल्याचे दिसून येत असून एकंदरीत आगाराच्या कारभारा बाबत प्रवासी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून कारभार सुधारणार तरी कधी ? असा सवाल विचारला जात आहे.याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

   आज बुधवार दि.१० डिसेंबर रोजी मुरुड आगारातून सकाळी ६.०० वा.सुटलेली मुरुड -भांडूप एस टी नांदगाव -दांडा येथे ब्रेक डाऊन झाल्याने सुमारे ४० प्रवाशांचा खोळंबा झाला,दि.४ डिसेंबर रोजी सकाळी कल्याण हून मुरुडला येणारी गाडी काशिद व बारशिव दरम्यान बंद पडली होती,याच दिवशी सकाळी मुरुड हून सकाळी साडेपाच वाजता सुटलेली मुरुड -धुळे गाडी पेण येथे इंधन (डिझेल) कमतरतेमुळे सुमारे सव्वा तास रखडल्याने प्रवासी खोळंबले होते.

अशाच प्रकारे रस्त्यावर गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर दिसून येत आहे.

  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरवून येथील प्रवासी वर्गाला एस टी सेवेची उत्तम प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिलासा द्यावा.अशी मागणी जोर धरीत आहे.

   * मुंब्रा येथे वेळेत पोहोचण्यासाठी दि.४ डिसेंबर रोजी मुरुड सकाळी साडेपाच वाजता सुटलेल्या मुरुड -धुळे गाडीने मुरुड येथून प्रवास करत असता पेण येथे डिझेल भरण्यासाठी गाडी सव्वा तास रखडल्याने आम्ही आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता येथील डिझेल पंप सात वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले.वेळेत पोहोचता न आल्याने अखेर कामे होण्यात विलंब झाला.स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्यात आदेश देण्यात यावेत.

                     - सैबाज अरब 

       मु.माझेरी,पो.राजपुरी,ता.मुरुड-जंजिरा (रायगड)

      ______________________________

* आज मुरुड -भाडुप एस टी ने भांडुप येथे लग्न कार्यासाठी या गाडीने सकाळी सहा वाजता मुरुड येथून प्रवास करत असता नांदगाव -दांडा येथे गाडी ब्रेक डाऊन झाल्याने माझ्यासह सुमारे चाळीस प्रवाशांचा अर्धा तास खोळंबा झाला, त्यामुळे आम्ही लग्न कार्यासाठी एक तास उशिरा पोहोचलो.

         महेश मिरजणकर

           भंडार वाडा, मुरुड जंजिरा (रायगड)

________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर