Type Here to Get Search Results !

मुरुड नगरपरिषद दत्तवाडी परीसरात दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर : शालेय विद्यार्थी व रहिवासी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


 

कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) मुरुडच्या नगरपरिषद हद्दीतील दत्तवाडी, प्राथमिक शाळा परीसरात गेल्या चार पाच वर्षांपासून दुर्गंधी युक्त सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर बाहून येत असल्याकारणाने येथील रहिवासी व मुरुड नगरपरिषद शाळा क. ५ च्या विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी पालक व रहिवाशांतर्फे मुख्याधिका-यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

     त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील कवडी येथे सिटी सर्व्हे.नं.४२३ मुरूड नगरपरिषद शाळा क्र.५च्या बाजुला काटे अपार्टमेंट ही रहिवासी इमारत आहे. सदर इमारतीमध्ये २२ रहिवाशी फ्लॅट असून सदर इमारतीमध्ये अंदाजे १०० लोक रहात आहेत.

   परंतु सदर इमारतीचे बांधकाम करते वेळी अपुरा शौचखड्‌डा (टाकी) बांधण्यात आल्याकारणाने सदर शौचालयातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून तसेच लागून असलेल्या शाळा क्रमांक ५ जवळ असलेल्या गटारातून वाहत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे व याचा परिसरातील रहिवाशांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनात आरोग्यावर वाईट परिणाम होवू लागला आहे. तसेच या भागांत डासांचा प्रार्दुभाव होवून वेळप्रसंगी डेंग्यूसारख्या घातक रोगाची व साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   याबाबत इमारतीजवळच राहणारे रहिवासी संजय लक्ष्मण फुलमाळी यांनी वैयक्तिकरित्या दि. ५/०८/२०२१ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी-रायगड अलिबाग व मुरुड तहसिलदार यांचेकडे दि. १५/०९/२०२१ दुर्गधीयुक्त सांडपाणी त्यांचे रहदारीच्या रस्त्यावरून वाहत असल्याबाबत व दुर्गंधीमुळे होण्या-या त्रासाबद्दल तक्रार अर्ज दाखल करुन  सांडपाण्याची व्यवस्था करण्याकरीता, परवानगी देण्यांबाबत A माहीतीच्या अधिकारांत माहीती मागविली असता ना. क. मु.जे.न.प. कर विभाग /माअ/१३६२/२०२१-२०२२ दि. ०१/११/२०२१ अन्यये आपले कार्यालयाकडून अभिलेखात  माहीती उपलब्ध नाही व पत्रातील क. २ नुसार अहवाल सादर केला आहे, असे लेखी उत्तर देण्यांत आले आहे. 

       परंतु प्रत्यक्ष इमारतीच्या ठिकाणी सांडपाण्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करणेकरीता क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची व्यवस्था केलेली आहे,त्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यातून आपल्या संबंधीत आरोग्य अधिकाऱ्याकडून आपणांस सादर केलेल्या अहवालावरून संबंधीतांना कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात सूचना न दिल्याचे निदर्शनास येत आहे.

      आपल्या कार्यालयातील आरोग्य आधिकारी राकेश सुभाष पाटील यांच्याकडे काही रहिवाशींनी वेळोवेळी या विषयासंबंधी मौखिक तक्रार देखील केली होती. परंतु त्यांनी या विषयावर कायमस्वरुपी कोणतीही कार्यवाही केलेली नाही असे निदर्शनास येते. याकरीता नगरपरिषद कार्यालयाकडून व शासनाकडून अद्यापपर्यंत गेली ४ वर्षे होऊन सुध्दा कोणतीही दखल घेण्यांत आलेली नाही.  शासनाकडून स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यांत येते. परंतु आमच्या दत्तवाडी परिसरांत स्वच्छता मोहीम राबविण्यातच आलेली नाही व काटे अपार्टमेंट या रहिवासी इमारतीमधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरीता आपल्या कार्यालयाकडून ठोस उपाययोजना करण्यांत आलेली नाही अथवा संबंधी बिल्डर यांचेकडून याबाबत उपायोजना होणेंकामी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यांत आलेली नाही.

    येथील रहिवाश्यांनी तक्रारी केल्यानंतर आपले कार्यालयाकडे सदर बाबत तक्रार करण्यांत आलेली होती, परंतु तात्पुरत्या स्वरूपात येथील सांडपाणी टँकरचे काढून नेण्यांत येते व पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते,तरी आम्हा रहिवाश्यांचा व मुरूड नगरपरिषद शाळा क्र. ५ मधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊ सदर इमारतीमधून निर्माण होणाऱ्या दुर्गंधी युक्त सांडपाण्याची कायम स्वरूपी ठोस व्यवस्था करण्यांत यावी.

       भविष्यांत सदर दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषद कार्यालय तसेच संबंधीत आरोग्य व्यवसथेची राहील.याची कृपया नोंद घ्यावी.असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असू  दत्तवाडी येथील काटे अपार्टमेंट या इमारतीमधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याच्या विल्हेवाटीबाबत आपण प्रत्यक्ष पाहणी करून इमारतीच्या जागेत सांडपाणी विल्हेवाट करण्याचीयोग्य व्यवस्था होणेकामी अर्ज सादर केल्यापासून  १५ दिवसांत तात्काळ कारवाई न केल्यास आम्हा दत्तवाडी येथील रहिवाशांकडून या विरोधात आंदोलन छेडण्यांत येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील.असे म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री,खासदार सुनिल तटकरे, अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव,कोकण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी,उप विभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक-रायगड,मुरूड तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

 यावेळी दत्तवाडी येथील संजय फुलमाळी, विजय वाणी, विजय सुर्वे, संतोष वाणी, विजय गुरव, रोहित जमादार, उल्हास विरकुड, निलेश खामकर, अशोक भुसाणे, मंगेश मोहिते, प्रवीण भायदे, देवेंद्र गुरव, नारायण नांदगावकर, विरेंद्र भगत, मंदार बाक्कर रहिवासी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर