कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)शेतीचे महत्त्व, उपयोग व विविध पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा. या उद्देशाने अलिबाग तालुक्यातील हटाळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल डावाळे मेस्को येथील भास्कर थळे बंधुंच्या शेतावर आयोजित करण्यात आली होती.
इकोक्लब उपक्रमांतर्गत आयोजन करण्यात आलेली ही सहल अध्यक्ष परी पवार (इ. ७ वी) व उपाध्यक्ष साई मोहिते (इ. ६ वी) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
भातशेतीच्या विविध टप्प्यांची तसेच पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने होणाऱ्या भात लावणी प्रक्रियेची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भात लावणी करण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे त्यांना कष्टाचे व शेतीकामाचे महत्त्व समजून घेता आले.
प्रत्यक्ष आवण खननी, मूठ बांधणी व लावणी संदर्भात भास्कर थळे यांच्या कन्येने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शेतीविषयक अनुभव सांगितले. त्याचप्रमाणे भाजीपाला लागवडी बाबतची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. शेती या जीवनावश्यक विषयाची प्रात्यक्षिकात्मक ओळख करून देणारी ही सहल विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील, असे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले.
शालेय व्यवस्थापन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जान्हवी घरत, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी भोपी, डॉ.संदीप वारगे, शिक्षिका सीमा नागावकर, विजया माळी आणि स्वयंपाकी काकी प्रीती कीर यांचे शैक्षणिक सहलीसाठी विशेष योगदान लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या