रायगड(विशेष प्रतिनिधी) पैशाच्या आणि दागिन्यांच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर गावात एका वृद्ध महिलेचा खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोघा अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे.
शेवंती सखाराम भावे (वय ८०) या वृद्ध महिला कणघर येथे एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक आहे. २० जुलै २०२५ रोजी टीव्ही बंद पडल्याने राज (वय १६, नाव बदललेले) याला दुरुस्तीसाठी बोलावण्यात आले. त्याने आपल्या मित्र अण्णा (वय १७, नाव बदललेले) याला देखील बोलावले.
टीव्ही दुरुस्तीच्या निमित्ताने दोघांनी २३ जुलै रोजी पुन्हा शेवंती भावे यांच्या घरी भेट दिली. त्या वेळी झालेल्या वादात त्यांनी तिचा गळा दाबून हत्या केली आणि ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. मृतदेहाला नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी तिला शांतपणे पलंगावर झोपविले.
चार दिवसांनी नातेवाईकांनी दागिने गायब असल्याचे लक्षात घेत पोलिसांत तक्रार दिली. सुरेश भावे यांनी २६ जुलै रोजी तक्रार दाखल केल्यानंतर म्हसळा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक संदीप कहाले आणि त्यांच्या पथकाने दोघांना अटक केली. आरोपींवर भादंवि कलम ३०२, ३११(५) अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्यांना कर्जतच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या