कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड जंजिरा पर्यटनात पावसाळ्यात बंदी असतानाही येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गारंबी धरणावर आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोहताना पर्यटक बुडता बुडता वाचल्याने अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुरुड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गारंबी धरणामध्ये पोहण्यास मनाई असताना सुद्धा कित्येक अतिउत्साही पर्यटकांचा मोह अनावर होऊन तुडुंब भरलेल्या धरणामध्ये धाडसी आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात परंतु धरणाच्या खालील भागात रुंद आकाराचे पाईप टाकलेले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग हा फार जोरात होत असतो आणि त्यातूनच ह्या सर्व गोष्टी स्थानिक लोक पर्यटकांना सांगत असताना देखील त्यांची थट्टा करत न जुमानता अतिउत्साही पर्यटक निसर्गाशी मस्ती करण्याचा प्रयत्न करीत दुर्दैवाने आपल्या जीवावर बेतून घेत असल्याचे बोलले जात आहे.
मागील रविवारी याठिकाणी अशीच एक दुर्घटना होता होता टळली,आठ दहा पर्यटक त्याच्यामध्ये लहान मुले आणि त्यांचे आईवडील सुद्धा होते,मुलांनी धरणामध्ये उद्या टाकल्या,त्यात मध्येच त्यांचा सहका-याने सुद्धा उडी मारली आणि तो बुडून खाली गेला त्यानंतर त्यांच्यातल्याच दोघांनी त्याला वर आणले, त्यामुळे त्याचा जीव वाचला, नशीब बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला !
पर्यटक पोहताना डुबक्या मारत असलेल्या याच गारंबी धरणातून पाणीपुरवठा केला जात असून दुषित पाण्यामुळे मुरुडवासीयांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुरुड मधील सुजाण नागरिक कचरा किंवा तुंबणारी गटारे किंवा समुद्रकिनाऱ्यावरील कचरा घाण यापासून नागरिकांना होणारा उपद्रवसार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यामुळे पर्यटनावर होणारा परिणाम याबाबत सामाजिक कार्यकर्ते,सुज्ञ नागरिक वेळोवेळी आवाज उठवत असतात.जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नी, आरोग्य विषयक या सामाजिक प्रश्नाकडे समाजसेविका बरोबरच लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
गारंबी धरण मुरुड नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली येत असल्याकारणाने नगरपरिषदेने पोलीस ठाण्यात पोहण्याचा मोह अनावर होणा-या अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र देण्यात येत असून मुरुड पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले आहे.गारंबी धरणावर कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या