Type Here to Get Search Results !

मौजे मेघरे,कारविणे, गालसुर धबधबा व बाणगंगा,सायगांव धरण या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

 

 

रायगड,(जिमाका) दि.17:- श्रीवर्धन पोलीस ठाणे हददीतील धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात येथे मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांची/ तालुक्यातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनास त्रासदायक ठरते, तसेच मान्सून कालावधीमध्ये धरण, धबधबे व तलाव पूर्ण भरुन वाहत असतात व मान्सुन मुळे आजुबाजुच्या डोंगर कपाऱ्यांमधून धबधबे सुरु होतात. त्यामुळे पर्यटक व नागरीकांची तेथे झुंबड उडते त्यामुळे मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

या भागांमध्ये पाण्यात बुडुन मृत्युबाबत घटना घडल्या आहेत. तसेच कारविणे येथील धबधब्याच्या पाण्यात बुडुन मृत्युबाबत श्रीवर्धन पोलीस ठाणे मध्ये दि. 17 जून 2025 रोजी अकस्मित मृत्यु क्रमांक 10/2025 हा दाखल आहे. तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात लोकांची गर्दी होऊ नये तसेच जिवीत हानी होऊ नये याकरीता ह्या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये पुढीलबाबींकरिता दि.26 जून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीकरिता श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहेया दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघडया जागेवर मद्य सेवन करणे. 

पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात/खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जिवित हानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.  सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे.सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धरण/तलाव/धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात दुचाकी/तीन चाकी/चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), या अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर