Type Here to Get Search Results !

जंजिरा किल्ला पाहण्यात पर्यटकांची कसरत दिवाळी पर्यंत संपणार?


कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) शिडाच्या होडीतून मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यास जाणाऱ्या पर्यटकांची कसरत लवकरच संपणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ब्रेक वॉटर बंधारा ते जेट्टीदरम्यान ॲल्युमिनियम धातूचा एक ४० मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामास काही दिवस लागणार असले तरी पर्यटकांना सुरक्षित प्रवासाचा आनंद दिवाळीनंतरच घेता येईल, अशी माहिती मेरिटाइमच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. 

      लाटांचा वेग कमी व्हावा म्हणून किल्ल्यापासून ४० मीटर अंतरावर ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात येत आहे. किल्ल्याचे पुरातत्त्व महत्त्व कमी होऊ नये, यासाठी किल्ल्यापासून काही अंतरावर ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली होती. बंधाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक ॲल्युमिनियम धातूचा पूल बसवला जात आहे.

       याची संरचना पूर्ण झाली असून हा पूल क्रेनच्या साहाय्याने आणून बसवला जाणार आहे. पावसाळ्यात किल्ल्यात जाण्यास बंदी लागू होणार असून त्‍यानंतर थेट दिवाळीपूर्वी किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार आहे. किल्ल्यात जाण्यासाठी प्रवास सुरक्षित होणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांची कसरत राजपुरी व खोरा बंदरातील जेट्टीवरून किल्ला पाहण्यासाठी बोटीने जावे लागते; मात्र मार्चनंतर समुद्र खवळण्यास सुरुवात होते. त्‍यामुळे पर्यटकांच्या जिवास धोका उद्‌भवण्याची शक्‍यता असते. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा लहान मुले, पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर ठेवावे लागते आणि ते असुरक्षित असल्याने सरकारने जंजिरा किल्ल्यात नवीन प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला.

एकूण खर्च ९३ कोटी

प्रवासी जेट्टीसाठी ९३ कोटी रुपयांचे काम २०२३ मध्ये सुरू झाले. ही जेट्टी किल्ल्याच्या मागच्या बाजूस असल्याने महाकाय लाटा उसळत असतात, म्हणून लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला. मे २०२४ला ब्रेक वॉटर बंधारा पूर्ण झाला; परंतु जानेवारी २०२५ उजाडले तरी जेट्टीचे पुढील काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.जेट्टीच्या पुढील कामासाठी लागणारे प्लिंथ कॅप आगरदांडा परिसरात बनवण्याचे काम केले गेले. १५० मीटर ब्रेक वॉटर बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा अडवल्या जातील आणि प्रवासी जेट्टी पूर्णपणे सुरक्षित असेल. पर्यटकांना सहज जेट्टीवर उतरून किल्ला निवांत पाहता येईल

ब्रेक वॉटर बंधारा ते किल्ल्यातील जेट्टीपर्यंतच्या ४० मीटर अंतरासाठी एक ॲल्युमिनियमचा पूल टाकला जात आहे. हे काम पूर्ण होण्यास काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर काही किरकोळ कामे शिल्लक राहतील, ती पावसाळ्यात केली जातील.

- सुधीर देवरा, कार्यकारी अभियंता, मेरिटाइम बोर्ड

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर