कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील
डोंगराळ दुर्गम भागातील सागरगड माची येथे गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती या ठिकाणी असून त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत.असे असताना सदर भागामध्ये ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी सुरु असून येथील आदिवासी व ठाकूर समाजाच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय दूर होण्याबाबत आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद यांनी ॲड.डॉ.के.डी.पाटील, डॉ.संदीप वारगे, ॲड.विक्रांत पाटील सहकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले.सदरचे निवेदन रायगड जिल्हा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी स्विकारले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील सागरगड माची या डोंगराळ भागामध्ये आदिवासी व ठाकूर समाज पिढ्यानपिढयांपासून राहत असून या भागामध्ये एक ठाकूरवाडी, दोन कातकरी (आदिवासी) वाड्या आहेत. त्याचप्रमाणे वरील समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा, सागरगड माची देखील आहे. आदिवासी समाज व ठाकूर समाज हा एक आदिम समाज असून तो आपल्या देशातील एक महत्वाचा मुळ निवासी समाज आहे. डोंगर भागातील वनसंपत्तीमध्ये मोलमजुरी करून व काबाडकष्ट करुन पिढ्यानपिढ्या हा समाज या भागामध्ये राहत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे व उपजिवीकेचे साधनही याचा भागावर अवलंबून आहे. सदर दळी भागामध्ये आदिवासी लोक नाचणी, वरी, भात, भाजीपाला याचे उत्पादन घेवून उदरनिर्वाह करीत आहेत.याठिकाणी सत्तर गायींचा गोठा असून पुर्वीपासून वास्तव्य आहे.
असे असताना काही धनदांडग्यांच्या या भागातील शिरकावामुळे व आर्थिक हितसंबंधांमुळे आदिवासी व ठाकूर समाजाच्या राहत्या घरांची तोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांना दिलेल्या दळी भागामध्ये अतिक्रमण करून हे धनदांडगे लोक व त्यांचे हस्तक आदिवासी, ठाकूर समाजाला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. मात्र सदर दळी भागांवर झालेले अतिक्रमण व नासधुसीमुळे भविष्यात या समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती या ठिकाणी राहत असून त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत.असे असतान सदर भागामध्ये ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी सुरु आहे. सदर मोजणीला देखील आदिवासी, ठाकूर समाजाचा ठाम विरोध असताना त्या विरोधाला व विनंतीला न जुमानता ही मोजणी सुरुच आहे.सदर मोजणी तात्काळ रद्द करणे गरजेचे व आवश्यक आहे.
मानवाधिकाराचा विचार करुन आदिवासी व ठाकूर समाजाच्या विरुध्द सुरु असलेल्या अनुचित मानवी प्रथेचा कायमचा बिमोड करुन त्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.असे आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा अप्पर अधिक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा भूमी अभिलेख, प्रांताधिकारी, तहसीलदार,पोयनाड पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.
आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार ॲड.डॉ.के.डी.पाटील, डॉ.संदीप वारगे,ॲड.विक्रांत पाटील,गणेश कातकरी, सल्लागार संतोष चिंचकर, ॲड.नरेश पाटील, दिलिप कातकरी,श्रीमहंता सिद्धेश्वर रामस्वरुपदास त्यागी, संस्थेचे कोषाध्यक्ष जगदीश हिलम यांसह आदिवासी बांधव व महिला संख्येने यावेळी उपस्थिती होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या