डॉ.संदीप वारगे मानद डॉक्टरेटने सन्मानित
कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हटाळे येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील लक्षणीय कार्यासाठी हरियाणा येथील"मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाउंडेशन या संस्थेने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
डॉ . संदीप वारगे यांनी १५० उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण राष्ट्रीय मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून आणल्याबद्दल आणि शिक्षणात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात एकूण ३० वर्षांचे शिक्षक म्हणून कार्य असून त्यांनी हटाळे शाळेत बदली झाल्यानंतर शाळेच्या पायाभूत सुविधा बदलून टाकल्या,विज्ञान प्रयोगशाळा,ग्रंथालय,ऑनलाईन ओलॅब,लॅपटॉपसह स्मार्ट शिक्षण तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या हाती दिले. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पहिली डिजिटल शाळा साकारण्याच उपक्रम तालुक्यात आदर्श ठरला !
त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार" प्रदान केला. त्यानंतर इंडिया स्टार इंडिपेंडंट अवॉर्ड २०२४, भारत विभूषण पुरस्कार २०२३, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान, तसेच रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९-२० यांसारखे अनेक मान्यतेचे सन्मान डॉ . संदीप वारगे यांना प्राप्त झाले.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, रामेश्वरम चे कोकण विभाग समन्वयक म्हणून त्यांनी २० विद्यार्थ्यांना उपग्रह प्रकल्पात सामावून घेतले. या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे प्राप्त झाली. ते लायन्स क्लबचे रिजनल सेक्रेटरी म्हणून कार्यरत राहून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप,नेत्रतपासणी,आरोग्य व रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांतून मदतीचा हात दिला आहे.
तसेच त्यांनी केरुनाना – महाराष्ट्राचे आद्य गणितज्ज्ञ व थोर गुरूंच्या जीवनावर आधारित पुस्तक तयार करून इतिहासात हरवलेल्या व्यक्तिमत्त्वास उजाळा दिला आहे. जिल्हा आदर्श शिक्षक संघटना रायगड चे राज्य उपाध्यक्ष, आणि राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष डॉ.वारगे
कार्यरत असून शिक्षणातील योगदान हे आधुनिकता, मूल्यशिक्षण, आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्कृष्ट संगम असून, ते राज्यातील शिक्षकांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !
त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या