तेलवडे गावातील श्रीहनुमान जन्मोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा !
मुरुड तालुक्यातील तेलवडे या गावातील मंदिरात गुरुवारी पहाटे श्री हनुमान जन्मकाळ सोहळा तेलवडे, मुरुड, लक्ष्मीखार येथील शेकडो ग्रामस्थ भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यंदा श्री हनुमान जन्मोत्सवाचे १२५ वे.वर्ष आहे !
गावातील ग्रामस्थ रवि ह. पाटील, काशिनाथ करमरकर, कृष्णा वारगे यांचे हस्ते श्रीहनुमानाची पहाटे विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. हनुमान मूर्तीला पाळण्यात ठेवून सुहासिनींच्या हस्ते पाळणा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा येथील ह. भ. प. मंदार भावे यांचे हनुमान चरित्रावर पहाटे ६ वाजता सुश्राव्य किर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. तेलवडे ग्रामस्थांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. पहाटे जन्मकाळ, आरती नंतर प्रसाद देण्यात आला. हनुमान जयंती निमित्ताने गावातून पालखी काढण्यात आली. यानिमित्ताने यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश तांबडकर यांच्या सहअनेक ग्रामस्थांनी प्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या