साळाव पूलावरुन सोळाटन वाहतूकीची परवानगी देण्यात यावी अन्यथा जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन : अरविंद गायकर
कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड व रोहा या तीन तालुक्याचा दुवा असलेल्या साळाव पुलाच्या दुरुस्ती नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बारा टनांपर्यंत घातलेल्या अटीमुळे, नवीन गाड्या मिळत नसल्याने मुरुड मधील प्रवासी वर्गाला अद्याप जुन्या भंगार अवस्थेतील गाड्यांमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.यासाठी वाहतूकीची अट रद्द करुन सोळाटन वाहतूकीची परवानगी देण्यात यावी.अन्यथा याविरोधात जनतेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी दिला आहे.गेल्या काही वर्षांपासून मुरुड आगाराला नवीन गाड्या न मिळाल्याने याचा प्रवासी वर्गाला त्रास व हाल सहन करावा लागत आहे.मुरुड-जंजिरा पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी सातत्याने वाढती वर्दळ असते.त्यातच मुरुड आगारात असणाऱ्या गाड्या जून्या असून भंगार अवस्थेत असल्याने याचा चालक वाहकांसह प्रवासी वर्गाला मन:स्थापन सहन करावा लागत आहे.
याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे आगार प्रमुख व विभाग नियंत्रक पेण यांना अर्ज विनंत्या व निवेदन देण्यात येऊन उपाययोजना बाबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली आहे.
साळाव पूलावरुन नवीन BS6 बसला परवानगी मिळणे बाबत मुरुड आगार प्रमुख यांनी दि.४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी -रायगड यांना लेखी पत्राद्वारे कळविले असून त्याच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता व उपविभागीय अभियंता मुरुड यांना देण्यात आल्या आहेत.सदरचे पत्र देऊन महिनाभरात यावर कोणती कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.
मुरुड आगार प्रमुखांनी दि.४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रानुसार अद्याप अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे मुरुड आगाराला नवीन गाड्या येत नाहीत, या भंगार अवस्थेतील गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरलेली असून काही लांब पल्ल्याच्या गाड्या मध्येच बंद पडतात हे रोजचेच झालेले आहे, उन्हाळ्यात मे महिन्यात पर्यटकांची रेलचेल सुरु झाली असून अनेक जण एसटी मधून प्रवास करतात आणि नाराजी व्यक्त करतात.यासाठी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत साळाव पूलावरुन सोळाटन वाहतूकीची परवानगी मिळावी,जेणेकरून नवीन एसटी गाड्या मुरुड आगाराला मिळतील आणि येथील प्रवाशांचा प्रवास सुरक्षितपणे होईल.अन्यथा नाईलाजास्तव याविरोधात जनतेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे अरविंद गायकर यांनी सागितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या