कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) शासन निर्णयानुसार संपूर्ण मुरुड तालुक्यात100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत दि.१एप्रिल ते दि.१० में २०२५ या कालावधीत “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेसाठी तहसीलदार रोहन शिंदे यांची “समन्वय अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यांत आलेली आहे.
सदर मोहिमेअंतर्गत दिनांक 01/04/2025 ते 05/04/2025 या कालावधीत तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी त्यांचे सजातील गावांमध्ये चावडी वाचन करून गाव निहाय मयत खातेदार यांच्या यादी तयार करणार आहेत.
मुरुड तालुक्यात याशिवाय मोहिम कालावधीत 7/12 वरील खालील नोंदीच्या बाबतीत सुध्दा कार्यवाही करण्यांत येणार आहे.
यामध्ये अ.पा.क नोंदी अद्यावत करण्यासाठी संबंधित खातेदारांकडून अर्ज प्राप्त करून घेणे,लक्ष्मीमुक्ती योजनेच्या लाभार्थीची 7/12 वर नोंद करून घेणेबाबत अर्ज प्राप्त करून घेणे,7/12 चे इतर अधिकारातील 32 ग च्या बोजाच्या नोंदीबाबत खातरजमा करणे,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या पात्र लाभार्थींना लाभाची रक्कम देणेसाठी प्रस्ताव तयार करणे तसेच मोहिम व्यापक स्वरूपात राबवून 7/12 वरील नोंदी 100% अद्यावत होण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी,मंडळ अधिकारी वरील शासन निर्णयाचे काटेकोर पालन करतील यासाठी “समन्वय अधिकारी” म्हणून मी स्वत: जातीने लक्ष देणार असल्याचे तहसिलदार रोहन शिंदे यांनी सांगितले.
“जिवंत सातबारा” मोहीमे मध्ये तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 100 % सहभाग नोंदवून 7/12 वरील नोंदी अद्यावत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे .असे आवाहनही तहसिलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या