कवीदीप दिपक सोनवणे या तरुण कवीचा '६३ बेधडक' हा नविन काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या काव्यासंग्रहातील कविता वाचून स्तिमित न झाल्यास नवलच ! हरहुन्नरी व्यक्तिमत्व दिपक सोनावणे यांचा सांस्कृतिक क्षेत्रातील वावर अचंबित करणारा असून साहित्यिक लेखन, कला दिग्दर्शक, गायन तसेच अभिनेता अशा विविध पैलूंवर त्यांनी हुकमत मिळवलेली दिसून येते.अल्पावधीत त्यांनी आपल्या या संग्रहातून नवा एल्गार जागविला आहे.
आपल्या रोजच्या साध्या जगण्यातही कितीतरी गोष्टींशी आपल्याला तडजोड करावी लागते. ही तडजोड किंवा विरोधाभास याकडे तटस्थतेने पाहून त्यांनी या कविता लिहिलेल्या आहेत. आपल्या भावनांचा उद्रेक होऊ न देता विचारपूर्वक शब्दांची मांडणी करुन त्यांनी या कविता लिहिलेल्या आहेत. यात त्यांचं कवीमन तर दिसून येतच पण प्रखर वैचारिक बैठक सुद्धा दिसून येते. सभोवतालचे सर्वच रंग आपल्याला भावतील असे नाही मात्र जो रंग आपण निवडू त्याचाच बेरंग होण्यासारखी परिस्थिती आपल्या सभोवताली निर्माण झालेली आहे. त्यांचं दुःखरं कवीमन यासाठीच कासावीस आहे. जे चांगलं आहे, जे शुद्ध आहे, जे उदात्त आहे ते जवळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कवीचा आहे. वरवर वाचताना या कविता साध्या वाटतात पण त्याचा भावार्थ उमगला तर त्याच कविता एक वेगळा आशय आपल्यासमोर उभा करतात. आपल्याला त्या भावना, त्यातील अर्थ बेचैन करतात. आपल्याला वाटणारी ही बेचैनी त्यांच्या प्रगल्भपणाचं उत्तम उदाहरण आहे.
कवी दीपक सोनवणे यांच्या एकूण ६३ कविता या संग्रहात आहेत. प्रत्येक कवितेला त्यांनी घोटून, अर्थवाही असे ताशीव स्वरुप दिलेले आहे. म्हणूनच त्या सर्वच कविता आशयघन झाल्या आहेत. कवीचे मन अतृप्त जरुर आहे, पण त्यांनी घेतलेल्या स्वानुभावाचे मार्मिक स्पष्टीकरण देखील त्यात आहे. मुळात चांगली शब्द संपत्ती असल्यामुळे व योग्य असा आचार त्यांच्या कवितेतून व्यक्त होत असल्यामुळे या कवितांनी एक वेगळीच उंची गाठलेली आहे.
नेहमीची सरधोपट कवितेची वाट जाणीवपूर्वक बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मनाची खदखद जशी आहे, तशी व्यक्त केली आणि त्याचीच एक एक कविता होत गेली. सजगतेने केलेल्या या कवितांना म्हणूनच एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. यातील कविता एकदा वाचून उमजत नाहीत... त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतात. नंतर त्याच्या शब्दशब्दातून कवितेचे विविध पदर आपल्यासमोर उभे ठाकतात. आपल्या मनाचे अवकाश त्या कविता व्यापून टाकतात.
कवी दीपक यांच्या 'बेधडक' कविता संग्रहाला रसिक जनांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभेल याचा विश्वास वाटतो. रसग्रहणासाठी या कविताचे प्रयोग व्हायला हवेत. अभिवाचन करुन या कविता जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचणे जरुरी आहे. जाणीवपूर्वक असा प्रयत्न झाल्यास या कवितांना निश्चितच रसिकाश्रय मिळेल, यात संदेह नाही.
दिपक सोनावणे त्यांची पहिलीच कविता आपल्या मनाचा ठाव घेते,कणभर सुख मणभर दुःख, ज्याच्या त्याच्या कर्मांवर,कधी येईल कसा आवळेल, काळ कुणाच्या गळ्यावर या वेगळ्या धाटणीच्या कवितांची नांदी ठरावी, अशी कविता. त्यांची तुकोबावरची कविता बरं झालं तुकोबा, तू चमत्कार दाखवला नाहीस संत होऊन माणूसच राहिलास, उगीच देव झाला नाहीस,
आजच्या जगातील भोंदूगिरी बद्दल केलेले हे भाष्य निश्चितच समोर प्रश्न निर्माण करते. खरोखरच आपल्या जाणिवा बदललेल्या आहेत का? आपल्या श्रद्धा अंधतेकडे झुकत आहात का? की आपण फक्त व्यक्ती पूजनाला महत्त्व देतो आहोत? आज असे अनेक प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.तू स्त्री आहेस तू शक्ती आहेस,दगड धोंड्यांना ओवाळू नकोस,काढून फेक ते सुरवंट काटेरी,उगाच त्यांना सांभाळू नकोस कविता आज ठिकठिकाणी स्त्रियांची अवहेलना केली जाते. अशा वेळी स्त्रियांचा आवाज बुलंद करणं जरुरीचं आहे. स्त्री बद्दलच्या जाज्वल्य भावना त्यांनी आपल्या 'शक्ती' या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
'मुक्त' या कवितेतून त्यांनी वर्षानुवर्षे पिंजऱ्यात बंद असणाऱ्या माणसांसाठी मुक्तीची अखंड चळवळ चालूच ठेवण्याचा विश्वास जागविला आहे. पिढीजात जे अनुयायी म्हणून वावरत होते, अशा स्वतःची किंमत हरवलेल्या माणसांसाठी कवी लिहितात- लेखून कमी ठेंगणं केलंत,पावलोपावली चाखला उपहास,कित्येक वर्षे वनवास भोगला,आता पुरे झाला कारावास अशा कवितेतून त्यांनी माय मराठी बद्दल विरोधाभास दाखवून दिला आहे. शिवाय *वाचक संपले लेखक घटले,नवीन साहित्य कुठे बनतेय,अडगळीत पडलेल्या पुस्तकांमध्ये,माझी माय मराठी मरते कवितेतून मराठी भाषेच्या स्थितीबद्दल कुणालाही खंत वाटावी अशा या भावना त्यांनी आपल्या कवितेत मांडलेल्या आहेत.
समाज जीवनाचं एक भळभळत वास्तव त्यांनी आपल्या 'अचानक' या कवितेतून मांडलं आहे.बरा होता होता माणूस लागलाय अचानक गचकायला,ढिसाळ व्यवस्थेचा हापूस लागलाय आता पिकायला कवितेतून अत्यंत सकारात्मकपणे प्रत्येक प्रश्नांची उकल करण्याची कवीची वृत्ती सतत नाविन्याचा ध्यास धरते आणि नव उमेदीच्या आशांनी दुःखांची झळ मागे सारते.थकलाय मेंदू,पण खोळंबणार नाहीत विचार,आता प्रत्येक क्षण साकारतील,ध्येयसृजन सद् विचार,थकलंय शरीर,पण खुंटणार नाहीत आकांक्षा,आता प्रत्येक श्वासासवे जन्मतील,नव उमेदीच्या आशा,आजच्या राजकीय विषयावर सुद्धा त्यांनी निर्भीडपणे भाष्य केले आहे. मग ते शिवरायांच्या पुतळ्याबाबत असो किंवा फुकट मिळणाऱ्या सरकारी योजनांबाबतचे धोरण असो. जाहिरातींना भुलून नवयुवक आपली जिंदगी वाया घालवीत आहेत. मात्र त्यांना याची जाणीव नाही, याचीही खंत कवीने आपल्या शब्दात व्यक्त केलेली दिसून येते. भंपकपणाच्या निरागस चित्राला फुलून राजकीय व्यक्तिमत्व तरुणांचा कसा वापर करुन घेतात हे वेळीच त्यांनी उमगले पाहिजे. कवीचे मन त्यामुळे विषण्ण होते.
या कवितासंग्रहात स्त्रीबद्दलच्या कविता, समाज बदलवू पाहणाऱ्या वैचारीक कविता, सांस्कृतिक मोल जपणाऱ्या कविता, उपहासात्मक कविता, महाराष्ट्रातील साधुसंतांच्या कविता तसेच जाज्वल्य देशाभिमानाच्या कविता आपल्याला वाचायला मिळतात,कृष्णासारखा सारथी सखा,हल्ली हवाय कोणाला,मृगळजळाची ओळ असणाऱ्याला,पाणी हवंय कशाला?अशी वेदना लिहिणाऱ्या दीपक सोनवणे यांनी या कवितेचा शेवट असा केला आहे, अंधाराची किमयाच न्यारी,इथे सगळंच लपून जातं,उजेड देतो दीपक तरीही,फुंकून त्याला विझवलं जातं अशा वाचनीय कविता मनाला भुरळ घालते.
- सुहास राऊत
लेखक निवेदक
कोमसाप पालघर जिल्हा प्रतिनिधी
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या