पी.एम.उषा अंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय व माणगाव येथील द.ग.तटकरे महाविद्यालय, मुरुड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा अंतर्गत "रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि संगणकशास्त्रातील नविन प्रवृत्ती" या विषयांवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, अंजुमन अंजुमन महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी, प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर व प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या परिषदेसाठी २८० हून अधिक संशोधकांनी सहभाग घेऊन २०० हून अधिक शोधनिबंध संकलित करून त्याची स्मरणिका आय.एस.बी.एन.प्रणालीने प्रकाशित करण्यात आली.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांना व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले.परिषदेचे मुख्य वक्ते डॉ. वसंत पंडित माळी यांनी "विविध शास्त्रशाखांचे संयोग आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधक, प्राध्यापक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भूमिकेवर प्रकाश टाकत हे संशोधन मानव आणि पर्यावरणाच्या फायद्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते यावर प्रकाश टाकला.पहिले व्याख्यानातून डॉ. अविनाश आडे यांनी प्लास्टिक कचऱ्याचे जैव-विघटन करण्याच्या प्रभावी उपायांवर मार्गदर्शन केले. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी "सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर, लँडफिलिंग, इन्सिनरेशन आणि जैव-विघटन" या उपाययोजना सुचविल्या.
दुसरे आमंत्रित व्याख्यान डॉ. गौरव लोहार यांनी दिले. त्यांनी "निकेल मोलिबडेट नॅनोस्ट्रक्चर्सच्या मदतीने हायब्रिड सुपरकॅपेसिटर्ससाठी ऊर्जा साठवण यंत्रणेच्या निर्मिती" बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तिसरे आमंत्रित व्याख्यानाद्वारे डॉ. सनोवर हुसेन यांनी "बायोडिग्रेडेबल फूड पॅकेजिंग फिल्मसाठी झिंक ऑक्साईड नॅनोपार्टिकल्सच्या संश्लेषण प्रक्रियेवर" चर्चा केली. त्यांनी नवीन संश्लेषण प्रक्रिया, संरचनात्मक व कार्यक्षमतेतील सुधारणा आणि शाश्वत अन्न पॅकेजिंगवरील परिणाम यावर भर दिला.चौथे आमंत्रित व्याख्यान श्री. निलेश शिंदे यांनी दिले. त्यांनी "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तंत्रज्ञानातील करिअरला दिशा कशी देता येईल?" यावर मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात सुरक्षित राहण्यासाठी आणि आघाडीवर राहण्यासाठी विविध एआय टूल्स शोधण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
या परिषदेच्या उदघाटनसमयी संयोजक डॉ. बी. एम. खांबकर आणि डॉ. साजिद शेख यांनी परिषदेचे महत्व विशद केले. या परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनामध्ये पीएम-उषा समन्वयक डॉ. पांडे जे. आर. यांचा सिहांचा वाटा आहे. सहसंयोजक प्रा.मेहरीन डावरे व प्रा. तमसील शहाजहान यांनी संपूर्ण संयोजन समितीसह, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिषदेचे उत्कृष्ट नियोजन केले. सत्र अध्यक्ष म्हणून डॉ. गुरमित वाधवा, डॉ. सचिन बंगाळे, डॉ. शाहीना मिर्झा, डॉ. बी.जी. राजभोज, डॉ. एस. ए. कानडे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. भगवान जाधव, डॉ.अजित केंगर आणि डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. या परिषदेमध्ये संशोधन कार्याचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संशोधकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परिषदेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. निदा गोरमे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या