नांदगाव नंतर आता मुरुड मध्ये दर्शन :नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजेच मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आहे. या अभयारण्यात काही वर्षापूर्वी रानगवे सोडले होते आता या रानगव्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये संचार सुद्धा वाढला आहे. फणसाड अभयारण्य नांदगावला लागुन असल्याने हे रानगवे गावात शिरले होते. आता त्यांचा संचार मुरुड शहरानजीक दिसू लागला आहे.
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्र किनारी डिसेंबर महिन्यात पहाटे ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले. सदर रानगवा हा गावालगतच्या फणसाड अभयारण्यातून आला असून शुक्रवारी सकाळी तो नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील खालचा मोहल्ला परिसरातील गौतम दाभणे यांच्या नारळ सुपारी बागेतून रस्त्यावर आला. दरम्यान एका व्यक्तीला त्याने टक्कर मारुन तो नांदगाव समुद्रकिनारी पळून गेला. त्यानंतर त्याने समुद्र किनाऱ्यासह नजिकच्या बागांतून हुंदडत परत फणसाड अभयारण्याकडे कूच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर मुरुड राजवाडा परिसरात रानगव्याचा संचार दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-----------------------------------------------
मुरुड राजवाडा परिसरात रानगव्याचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत असून फणसाड वन्यजीव अभयारण्य व वनविभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रानगवे मानवी वस्तीत येऊ नये.यासाठी समन्वय साधून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
- राहुल कुलकर्णी
वनपाल - वनविभाग, मुरुड-जंजिरा,जि.रायगड
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या