कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)मुरुडमध्ये 'क्षयरोग मुक्त भारत ' अभियान अंतर्गत दिनांक ११फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अलिबाग रायगड, पथक मुरुड व जंजिरा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त सहयोगाने पहिली सी एम इ Continuing Medical Education (CME) घेण्यात आली.
मुरुड तालुक्यातील जवळपास ३५ खाजगी डॉक्टर्स, सर्व सरकारी वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सी एम इ चे उद्घाटन प्रमुख अतिथी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.रचना विश्वजीत, वैद्यकीय क्षेत्रातील मुरुड तालुक्यातील नामवंत डॉ.मकबुल कोकाटे, जंजिरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय राज राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
भारत सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत सध्या 24 मार्च 2025 पर्यंतच्या १०० दिवशीय मोहिमे दरम्यान क्षयरोग नष्ट करण्यासाठी भरपूर उपक्रम व उपायोजना राबवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने मुरुड तालुक्यात सी एम इ घेण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉक्टर कोकाटे यांनी क्षयरोग कमी करण्यासाठी खाजगी डॉक्टरांचा खूप मोलाचा वाटा असतो, खाजगी डॉक्टरांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते.असे सांगितले. बरेचसे लोक हे साधारणतः सर्दी, खोकला व इतर सौम्य प्रमाणातील लक्षणे असल्यास खाजगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असतात, त्यामुळे क्षयरोग संशयित रुग्ण हे खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निदान होऊ शकतात व लवकर उपचार घेऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
तसेच डॉक्टर रचना विश्वजीत यांनी अगदी साध्या व सरळ भाषेत क्षयरोगाबाबतची माहिती,उपचार पद्धत व नवीन तपासणी याबाबतचे सखोलपणे सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.अक्षयराज राठोड व डॉ. पायल राठोड यांनी क्षयरोगाचे कामकाज हे सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणा यांनी एकत्रित येऊन काम केल्यास खुप प्रमाणात सोपे होईल याबाबतचे मार्गदर्शन केले.यावेळी कमलेश चव्हाण यांनी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अमित बेनकर,संकेत घरत,मयुरी कदम,गणेश शिंदे,राजेंद्र चूनेकर,मयूर पाटील,नंदकुमार घाडगे,प्रणय धसाडे,शालिकराव पावरा,प्राची चौलकर,सचिन बामणे व रसिका ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या