वि.गो.लिमये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा !
* मुरुड -नागशेत येथे गेट टुगेदर उत्साहात
कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुड-नागशेत येथील वरदेशान फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील वि.गो.लिमये विद्यामंदिरातील सन.१९८२-८३ च्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला !
दिवेआगरच्या वि. गो. लिमये विद्यामंदिरातील सन.१९८२-८३ मधील एस्. एस्. सी.विद्यार्थी ग्रुप १९८२-८३ हा दहावी नंतर गेली १७ वर्षे एकात्मतेने संघटित असून अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारा हा मित्र-मैत्रिणींचा समुह एकमेकांच्या सुखदु:खात एकोप्याने सामावलेला आहे. प्रत्येकजण आपलं कुटुंब,व्यवसाय सांभाळून एक कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून आज समाजात वावरत आहेत. स्वत:ची प्रतिष्ठा, मानसम्मान इथे कधीही मैत्रीच्या आड येत नाही. ह्याच स्नेहभावनेतून ह्या ग्रुपमध्ये एखाद्या संकल्पनेवर आधारीत स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं जातं. याआधी ०२ नोव्हेंबर २००८ रोजी अशाच प्रकारच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं पण त्यावर एका दुर्दैवी प्रसंगाचं सावट आलं त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही.
पण त्यानंतर ३० ऑक्टोबर २०११मध्ये शाळेच्या प्रांगणातच 'कृतज्ञता स्नेहसंमेलन' ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं . 'कृतज्ञता स्नेहसंमेलन' ही संकल्पना अधोरेखित करताना शाळा, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी ह्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना भेटवस्तू दिली. दुपारचं शिक्षकांसोबतचं स्नेहभोजन आणि रात्रीच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून हा कार्यक्रम पार पडला.
'कृतज्ञता स्नेहसंमेलन' ह्या विशेष संकल्पनेमुळे हा कार्यक्रम शाळेच्या इतर बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला !.
मुरुड -नागशेत येथे दि ११ व दि.१२फेब्रूवारी रोजी स्नेहसंमेलनाचं 'वरदेशान फार्म हाऊस येथे आयोजन करण्यात आलं. दु.१-०० वा.नियोजित स्थळी सर्वांचं आगमन होताच भेटीसाठी अधीर असलेल्या मनाला स्वर्ग दोन बोटे उरला. दुपारच्या जेवणानंतर प्रवासातील क्षीण दूर होताच फार्महाऊसवर कार्यक्रमाचे फलक झळकू लागले. संध्याकाळच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि गणेश पूजनाने करून आज हयात नसलेल्या बॅचमधील दिनेश रसाळ आणि देवदास सावकार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येऊन गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
माणूसकीवर आधारीत असणारी ह्या स्नेहसंमेलनाची संकल्पना अधोरेखित करताना ग्रुपमधील मुलींनी ' माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही प्रार्थना सादर केली. ग्रुपमधील काहीजण सेवानिवृत्त झालेत तर काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपली कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रतिचा आदर जपल्याने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आपण लिलया कसं सामोरं जाऊ शकतो तसंच आपल्या करिअर किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये कशाप्रकारची सावधगिरी बाळगावी ह्याविषयीचं प्रेरणादायी विचार मांडले. रात्री उशीरापर्यंत चालणारा हा मनोरंजनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर उठून चहापानानंतर जवळच असलेल्या दत्तमंदिरामध्ये श्रीदत्तात्रयाचं दर्शन घेऊन आमचं हे मैत्रीचं नातं अधिकाधिक वृध्दींगत व्हावं असा श्री दत्तात्रयाकडे आशीर्वाद मागितला. वयाचं भान विसरून श्रीदत्तात्रयाच्या प्रांगणात असलेल्या वटवृक्षाच्या पारंब्यावर कुणी झोके घेतले कुणी फांद्यावर चढले.
त्यानंतर सर्वांनी जंजिरा किल्ल्याकडे कूच केले. अथांग समुद्रातून प्रवास करताना होडीच्या हेलकाव्यात आणि प्रत्यक्ष जंजिरा किल्ल्याच्या प्रवेश दारात प्रवेश करताना, किल्ल्याच्या पायऱ्या चढताना एकमेकांसाठी दिलेला आधाराचा हात आणि मुखातून 'जयभवानी जय शिवराय' हा एकमुखाने निघालेला जयघोष हा आयुष्याच्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठीचं बळ मिळवून देणारा माणूसकीचा स्त्रोत होता. दुपारी सर्वजण फार्म हाऊसवर परतले. दुपारच्या जेवणानंतर सामानाची आवरा आवर करून स्नेहसंमेलनाच्या समारोपाचं मनोगत व्यक्त करताना मात्र कालच्या गळाभेटी इतकं बळ आजच्या निरोपाच्या हस्तांदोलनामध्ये नव्हतं तरीही पुढील स्नेहसंमेलनाच्या आश्वासनानेच ह्या स्नेहसंमेलनाची सांगता झाली !.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या