मुरुडच्या अंजुमन महाविद्यालयात पुस्तक पुनरावलोकन स्पर्धा
कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात पुस्तक पुनरावलोकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचलेल्या साहित्याचा विश्लेषणात्मक दृष्टीने अभ्यास करण्याची सवय लावणे हा होता.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या विविध पुस्तकांचा सखोल अभ्यास मांडत प्रभावीपणे पुनरावलोकन सादर केले. यामध्ये कथा, काव्य, आत्मचरित्र, विज्ञान आणि इतिहास अशा विविध विषयांवरील साहित्य समाविष्ट होते. “पुस्तक वाचन हे मनाच्या आणि विचारांच्या समृद्धीसाठी अत्यावश्यक आहे,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
पुस्तक पुनरावलोकन ही विद्यार्थ्यांसाठी वाचन अनुभव अधिक समृद्ध करणारी आणि त्यांची विचारप्रक्रिया प्रगल्भ करणारी स्पर्धा आहे.या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अलताफ फकीर आणि प्रा. जावेद खान यांनी केले. उत्कृष्ट पुनरावलोकन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र येत्या २६ जानेवारी २०२५ च्या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ग्रंथपाल प्रा. अंजुम दाखवे, डॉ. फिरोज शेख आणि इतर शिक्षकवर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर या स्पर्धेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या