जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड,(जिमाका)दि.24: मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2025 ला भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षित कालावधी पेक्षा 5 वर्ष अगोदर आहे. याकरिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध मोहिमा राबविल्या जात असून दि.23 डिसेंबर ते दि.03 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणारी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
जिल्हा टी बी फोरम व जिल्हा कोमारबिटी समन्वय समितीची बैठक जिल्हाधकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके व पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये यापूर्वी निश्चित केलेल्या अतिजोखीम ग्रस्त लोकसंख्येत (उदा. झोपडपटटी, विटभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरित तसेच खाणीमध्ये काम करणारे, कामगार, बेघर इ. सामाजिक गट तसेच तुरुंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, मनोरुग्णालय इ.) ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत अतिजोखीम ग्रस्त लोकसंख्येचे पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 57 सुक्ष्मदर्शीतपासणी केंद्रे व प्रत्येक तालुक्यामध्ये नॅट व क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध आहे. तसेच पिडीलाईट इंडस्ट्रीज यांच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झालेली मोबाईल एक्स-रे व्हॅन व महानगर गॅसच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले हँडहेल्ड एक्स-रे मशिन या करिता उपलब्ध करुन दिलेले आहे.
दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला तसेच दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी व अतिजोखमीच्या भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची धुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी करावी असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी रायगड डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या