कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा पदवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष निवासी शिबीर ०८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत मजगाव येथे उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उदघाटन ०८ डिसेंबर २०२४ रोजी झाले. उदघाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.टी.पी.मोकल,अंजुमन विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष स.जैनुद्दीन उ. कादिरी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय, राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येय व उद्धीष्टे, राष्ट्रीय सेवा योजना व ग्राम शहर विकास, व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचा वाटा या विषयांवर डॉ. टी.पी. मोकल यांनी शिबिरार्थिंना सखोल मार्गदर्शन केले.या शिबिरादारम्यान शिबिरार्थीनी दि.०९ डिसेंबर २०२४ रोजी ग्रामस्वच्छता केली व प्लास्टिकचे संकलन केले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणाची साफसफाई करण्यात आली. दि. १० डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२४ रोजी शिबिरार्थिनी गावात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरबाबत जनजागृती करण्यात आले व घरोघरी भेट देवून शिबिरा विषयी माहिती देण्यात आली.तसेच गावातील नदीकाठची स्वच्छता करण्यात आले.
पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ डिसेंबर रोजी पंचक्रोशी मजगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा रुग्णालयातील डॉक्टर आणि तंत्रज्ञ डोळ्यांच्या दोषाने त्रस्त असलेल्या लोकांची तपासणी करण्यासाठी उपस्थित होते.या शिबिराचा मुरुड परिसरातील सुमारे २०० लोकांनी लाभ घेतला. या शिबिरात २५ जणांना मोतीबिंदू आढळून आले असून त्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सुमारे ५० लोकांना स्वस्त दरात चष्म्यांचा लाभ झाला. या मध्ये रा.से.योजना स्वयंसेवकांनी मोठा सहभाग घेतला.
दि. १३ डिसेंबर २०२४ प्लास्टिक मुक्त भारत या अभियाना अंतर्गत वृत्तपत्रापासून पिशव्या बनवून बाजारामध्ये पिशव्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक दिवशी शिबिरार्थिंसाठी वेगवेगळ्या विषयावरती बौद्धिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. या समारंभाला महाविदयालयाचे अध्यक्ष श्री.स.जैनुद्दीन उ. कादिरी तसेच महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्यडॉ. साजिद शेख हे उपस्थित होते. ऍक्टिव्ह कॅम्पर व बेस्ट ग्रुप यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन करून शिबीर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरोज शेख, प्रा. निदा गोरमे, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा.सजगिन बडे व सर्व शिबिरार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या