भारतीय संविधान आपल्याला कर्तव्य आणि हक्कांची जाणीव करून देणारे.. - गृहपाल संदीप कदम
अलिबाग,दि.२६:- देशात घटनेच्या माध्यमातून विविध संप्रदाय, पंथ, भाषा, संस्कृती, परंपरा असून विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यावर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक भर दिला. सर्व नागरिकांना समान अधिकार, समान संधी प्रदान केली. सर्वधर्मियांना मतदान करण्याचा अधिकार दिला. कोणावरही अन्याय झाल्यास न्यायालयात न्याय मागण्याचा मार्ग दिला. विचार स्वातंत्र्य दिले. यातूनच स्पष्ट होते की, भारतीय संविधान आपल्याला आपल्या कर्तव्य आणि हक्कांची जाणीव करून देते, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल संदीप कदम यांनी आज येथे केले.
अलिबाग येथील शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. जयपाल पाटील, गृहपाल श्रीमती उषा गुंजेला, डॉ. अजित बर्गे, पोलीस हवालदार प्रशांत म्हात्रे, मंगेश कावजी, दामिनी पथकाच्या हवालदार ज्योत्स्ना मासे व मीनल म्हात्रे हे मान्यवर तसेच वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रारंभी गृहपाल श्री.कदम यांच्यासह उपस्थित सर्वांनी संविधान वाचन केले श्री.कदम यांनी संविधानाचे महत्त्व या विषयाची बहुमोल माहिती दिली.
डॉ. जयपाल पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला वाहिली व संविधान पुस्तकाची पूजा केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनात वाहनांचे अपघात यासाठी 108 क्रमांकाची संपर्क साधताना करावयाची कार्यवाही याची माहिती डॉ.अजित बर्गे यांनी दिली. या सेवेचा वापर गावासाठी कसा केला जातो, याचीही माहिती पायलट प्रशांत पाटील यांनी दिली. तसेच रायगड जिल्हा वाहतूक शाखेतून हवालदार प्रशांत म्हात्रे यांनी वाहनांच्या नवीन कायद्याची माहिती दिली, त्यांचे सहकारी मंगेश कावजी यांनी नवीन नियमांच्या छापील पत्रकांचे वाटप केले.
यावेळी उपस्थित मुलांपैकी सात जण विना वाहन परवाना गाडी चालवीत असल्याबद्दलची माहिती मिळाली असता त्यांना हवालदार प्रशांत म्हात्रे यांनी त्या मुलांना असे केल्याने त्यांचे काय नुकसान होऊ शकते, याची माहिती दिली.मुलींना आणि महिलांना बाळंतपणासाठी रुग्णालयात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 102 क्रमांकाच्या मदतीने रुग्णवाहिकेचा वापर कसा करावयाचा, ही माहिती जिल्हा रुग्णालयातील वाहनचालक श्री. मयूर पाटील आणि सहाय्यक किरण मोरे यांनी प्रात्यक्षिकासह दिली. फोन केल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी ॲम्ब्युलन्स सह 20 व्या मिनिटाला हजर झाले.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 112 या क्रमांकाचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखविताना अलिबाग पोलीस ठाण्यातून दामिनी पथक हवालदार मीनल म्हात्रे व ज्योत्स्ना मासे या दोन्ही पोलीस कर्मचारी 20 व्या मिनिटाला कार्यक्रमस्थळी पोहोचल्या.मुलामुलींनी आपापल्या गावातील जेष्ठ नागरिक व बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलांना उंचावरून घरातून रुग्णवाहिकेपर्यंत हाताच्या घडीवर बसवून कसे न्यायचे, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी हर्षदा होगाडे हिने केले व सर्वांचे आभार गृहपाल उषा गुंजेला यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास जयेश बोडेकर व आराध्य झाल्टे यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या