रायगड,दि.22(जिमाका):-मा.भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषीत केलेला असून त्यानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
त्यानुषंगाने रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात 189- कर्जत मतमोजणी केंद्र प्रशासकीय भवन, कर्जत, ता.कर्जत, 191-पेण मतमोजणी केंद्र के.इ.एस. लिटील एंजल स्कूल, पेण, ता.पेण, 192-अलिबाग मतमोजणी केंद्र जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, 193-श्रीवर्धन मतमोजणी केंद्र उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन ता. श्रीवर्धन, 194-महाड मतमोजणी केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, ता. महाड, परिसरात मतमोजणी होणार आहे. या परिसरात सर्व पक्षाचे प्रतिनिधी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यामुळे या परिसरात जनतेच्या जिवीतास व मालमत्ता, आरोग्यास धोका निर्माण होवून सार्वजनिक शांतता बिघडून दंगल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील 198-कर्जत,191-पेण, 192-अलिबाग,193-श्रीवर्धन, 194-महाड विधानसभा मतदार संघातील निवडणूक ही संवेदनशील असून मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात काही राजकीय पक्ष, संघटना यांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांच्याकडून सार्वजनिक शांततेचा व सुरक्षिततेचा भंग होऊन, गैरप्रकार घडून मतमोजणी प्रक्रियेस बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नमूद ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शांतता व सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यानुसार जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) (2) (3) अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 च्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 198-कर्जत,191-पेण, 192-अलिबाग,193-श्रीवर्धन, 194-महाड या विधानसभा मतदार संघामध्ये दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मत मोजणी प्रक्रियेकरीता मतमोजणी केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरासाठी खालील प्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे.
मतमोजणी केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात मतमोजणीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी व मतमोजणीच्या कामाकरीता संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदार संघ यांनी पारीत केलेले अधिकृत ओळखपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप किंवा ऑडीओ/व्हिडीओ रेकॉर्डीग क्षमता असलेली तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने सोबत बाळगणेस मनाई आहे. (निवडणुकीशी संबधित कामाकरीता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी यांना लागू नाही.) मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे. परवाना दिलेली शस्त्रे वा अवैध शस्त्रास्त्रे / धारधार शस्त्रे मतमोजणी केंद्रापासून 100 मीटरच्या आत घेवून जाऊ नये. (अपवाद - मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांना शस्त्र 100 मीटरच्या आत घेवून जाता येईल). मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात खाजगी इसमांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यास येत आहे. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात शासकीय वाहने तसेच परवानगी दिलेली वाहने सोडून कोणत्याही प्रकारचे वाहन आत नेण्यास मनाई करण्यात येत आहे. मतमोजणी निकाल झाल्यानंतर मतमोजणी केंद्राचे 100 मीटर परिसरात घोषणाबाजी करण्यास, फटाके वाजाविण्यास, विजयी मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे.
हा मनाई आदेश हा मतमोजणी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी 00.01 वा. पासून ते दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या