Type Here to Get Search Results !

राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे -जिल्हाधिकारी किशन जावळे


रायगड दि. 16- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.  जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत आयोजित बैठकीत श्री. जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. जावळे म्हणाले, निवडणुकीच्या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून सभा तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येते. या सर्व सभा व बैठकांची माहिती प्रशासनास देऊन त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विविध जाती, धर्म, भाषिक संप्रदायांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कुठलेही वक्तव्य करू नये. कुठल्याही धार्मिक स्थळाचा प्रचारासाठी वापर करू नये. समाजमाध्यमांवर पोस्ट करतेवेळी आवश्यक ती काळजी घ्यावी असेही श्री जावळे यांनी स्पष्ट केले. 


निवडणूक प्रचार काळात सर्व राजकीय जाहिरातीचे प्रामाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालय येथे माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सर्वांनी विहित वेळेत परवानग्या घ्याव्यात असे ही श्री जावळे यांनी सांगितले. 


 निवडणूकीच्या काळात काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे. त्या संदर्भात अधिसूचना व आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या निवडणूकीत पोलिसांची सोशल मीडियावर देखील करडी नजर असणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन श्री घार्गे यांनी यावेळी केले.

0000


निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव  बंधनकारक


रायगड जिमाका दि. 16- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024च्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १२७-क नुसार कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे, अन्यथा कोणतेही पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही.


निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये.


निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पाठवावी, अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.


निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुदतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणूकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा आहे. या निर्बंधाचे व्यतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सूचनांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर