Type Here to Get Search Results !

पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना



 



   रायगड (जिमाका)ता.12राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील वडार समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी आहे.  तसेच समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमातीतील वडार प्रवर्ग यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता रु. 1.00 लक्ष ची थेट कटर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व 25 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. सन 2024-25 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना व 25 टक्के बीज भांडवल योजना या योजनाचे अर्ज जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत.


 रु. 1.00 लक्ष थेट कर्ज योजना : लाभार्थीना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु. 2085.


25 टक्के बीज भांडवल योजना :- कर्जाची उच्चतम मर्यादा रु. 5 लक्ष पर्यंत. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 50 वर्ष आहे. बँकेमार्फत लाभार्थींना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 25 टक्के,  बँकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाच्या रक्कमेवर व्याजाचा दर 4 टक्के असतो.


या योजनांसाठी लागणारी सर्वसाधारण कागदपत्रे :- पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (विजाभज व वि.म.प्र), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.


वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनांकरीता महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.


वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. 10 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी 5 वर्ष असेल. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणानुसार), कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य महामंडळाच्या www.vint.in_ (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर घ्यावे लागेल.


गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत) :- विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्गतील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.


कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. 10 लक्ष ते  रु. 50 लक्ष पर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.  गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. परतफेडीचा कालावधी- मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कालावधी यापैकी जो कमी असेल तो.  कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि रु.15 लाखाच्या मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.in (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीन कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.


तरी इच्छुक, गरजू विजभज व विमप्र प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय,  श्री राम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क्र. 01, तळमजला, मारुती मंदिरामागे, चेंढरे अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड, दूरध्वनी क्र. 02141-221307, Email - vnvintdcraigad@lomail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर