कोर्लई,ता.३० (राजीव नेवासेकर)रायगड जिल्ह्यातील मुरुड आगार अनेक समस्यांनी चर्चेत असताना साखर चौथ गणपती विसर्जनानंतर एका समस्येने व्यवस्थापक राहुल शिंदेंचा अजब कारभार उघड झाला आहे. रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी जादा प्रवासी असतानाही जादा गाडी सोडण्यास नकार देणाऱ्या निष्क्रिय आगार व्यवस्थापकाची बदली करण्यात यावी.अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या डेपोमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्या ठिकाणी मुरुड पोलिस निरीक्षक उदय झावरेंच्या मध्यस्थीमुळे प्रवाशांना गाडी उपलब्ध करून देण्यात आली आणि अखेर प्रवाशांनी मुरुड पोलिस निरीक्षकांचे आभार मानले व आगार व्यवस्थापकांची बदली करण्याची मागणी केली आहे.
सदर घडलेल्या घटणेच्या दिवशी अनेक प्रवासी बुकिंग न मिळाल्याने परत जात होते. त्यावेळी मुरुड चे महेश कारभारी यांनी आगार व्यवस्थापकांना सुचना दिली होती की आज जादा प्रवासी भरपूर असल्याने एक जादा गाडी सोडावी त्यावेळी हे आगार व्यवस्थापक हो म्हणाले होते. परंतु रात्री ११ वाजता सुटणारी गाडी फुल्ल झाली होती, अनेक प्रवासी बाजार पेठेतील एसटी थांब्यावर गाडीची वाट पाहत होते.
काही केल्या जादा गाडी येत नसल्याने अनेक प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला ते सर्व आगारात गेले तर तिथे व्यवस्थापक नाही फक्त चालक व वाहक होते. म्हणजेच मुरुड आगार रामभरोसे असल्याचे दिसून आले. त्यावेळी समाजसेवक विजय सुर्वे हे त्यांच्या मुलांना मुंबई गाडीत सोडण्यास आले होते. त्यांनाही तिकीट न मिळाल्याने संतापले होते. आगार व्यवस्थापकांना फोन केला व सांगितले की जादाचे २५ ते ३० प्रवासी आहेत तरी जादा गाडी सोडावी अशी विनंती केली होती. परंतु या उद्धट आगार व्यवस्थापकाने अजब उत्तर दिले ते म्हणाले मी काही करू शकत नाही जर गाडी सोडायची असेल तर पहिले ४४ प्रवांशाचे पैसे भरा असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यामुळे सर्व प्रवासी प्रचंड संतापले होते. आगारात गोंधळ उडाला होता, काही गोंधळ होऊ नये म्हणून मुरुड पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
या वेळी पो.नी. उदय झावरे यांनी प्रवाशांमध्ये झालेल्या गोंधळाला शांत करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीमुळे पेण रामवाडी येथे संपर्क करून रायगड विभाग नियंत्रक घोडे यांना प्रवाशांची होणारी गैरसोय सांगितली व जादा गाडी सोडण्याची विनंती केली. त्यावेळी घोडे यांनी तात्काळ मुरुडच्या प्रवाशांना जादा गाडी उपलब्ध करून दिली.
जर मुरुड चे पोलिस येऊन प्रवाशांचे प्रश्न सोडवित असतील तर मुरुड आगाराचे निष्क्रिय आगार व्यवस्थापक कशासाठी? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. हा प्रश्न आगार व्यवस्थापक सोडवू शकले असते परंतु त्यांनी प्रवाशांना वेठीस धरले होते. तर अशा निष्क्रिय आगार व्यवस्थापकाची बदली करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी केली आहे. यावेळी पो.उप.नि दिपक राऊळ, समाजसेवक सचिन कासेकर, किशोर माळी, महेश कारभारी, विजय सुर्वे यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या