Type Here to Get Search Results !

पावसाळा तोंडावर येऊनही अद्याप सुपेगाव–फणसाड रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण नाही : बांधकाम खाते ठेकेदाराने तोंडाला पुसली पाने?वाहनचालक व प्रवासी वर्ग त्रस्त

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) पावसाळा ऐन तोंडावर येऊनही मुरुड -सुपेगाव –रोहा रस्त्यावर जवळचा मार्ग असलेला सुपेगाव-फणसाड दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या दुरावस्थेत असलेल्या मार्गाचे दुरुस्ती व डांबरीकरण अद्यापही न झाल्याने संबंधित बांधकाम खात्याने ठेकेदाराने तोंडाला पाने पुसली तर नाही ना?असा सवाल त्रस्त वाहनचालक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.

      हा रस्ता खड्डेमय व अतिशय अरुंद असून विशेषतः सुपेगाव ते फणसाड प्रवेशद्वारापर्यंतचा अंदाजे ४ ते ५ किमीचा भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत.या रस्त्याच्या कामात संबंधित बांधकाम खाते ठेकेदाराने तसेच फणसाड अभयारण्य विभागाने रस्त्यालगत असलेली झाडेझुडपे साफ करण्यात आली, मात्र मे महिन्याचा अखेरचा आठवडा सरत आला, पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले नाही.

   सध्या मुरुड – काशीद मार्गे रेवदंडा – अलिबाग या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास मोठा वेळ लागत आहे. परिणामी, मुरुड परिसरातील सुमारे ९०% ते ९५% नागरिक, पर्यटक,रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक करणारी वाहने वेळ वाचवण्यासाठी सुपेगाव – फणसाड मार्गाचा वापर करत आहेत.

परंतु सदर मार्ग अरुंद असल्यामुळे समोरून अवजड वाहने (एस.टी. बस किंवा ट्रक) आल्यास वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा वाहनांना जोखमीने मागे घ्यावे लागते. रस्त्याला साईड पट्टी नसून वळणेही अत्यंत धोकादायक आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मते, अनेक वेळा वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याच्या घटना थोडक्यात टळल्या आहेत.

मुरुड – काशीद – रेवदंडा – अलिबाग रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान १ ते २ वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यातच पावसाळा जवळ येत असल्यामुळे या मार्गाची परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.

   यासाठी सुपेगाव – फणसाड मार्गाचे शक्य तितक्या लवकर रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नाल्यांची व्यवस्था करण्यात यावी.अशी मागणी केली जात आहे.

 दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराशी मोबाईलवर संपर्क साधला असता, मंगळवारी रस्त्यावरील खड्डे व डांबरीकरण काम करण्यात येईल.असे सांगण्यात आले होते, मात्र रविवार दि.२४ तारीख येऊनही अद्याप रस्त्याचे काम झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर