कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर)ताज विवंता येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात,भारतातील आरोग्य सेवा आणि परिचर्या (नर्सिंग) शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटलच्या संचालिका आणि मालक डॉ. नूतन माळी यांना न्यूज१८ तर्फे प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टता आणि सामाजिक उत्थानासाठी त्यांनी समर्पित केलेल्या योगदानाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन हा गौरव करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रापलीकडे लेखिका आणि कलाकार
बहुमुखी प्रतिभा लाभलेल्या डॉ.नुतन माळी यांनी नर्सिंग शिक्षणावर १० हून अधिक अधिकृत पुस्तके लिहिली आहेत,जी आरोग्य क्षेत्रातील भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्यातील सर्जनशीलता कलाक्षेत्रातही दिसून येते,त्या 'लाईट इयर स्टुडिओ'च्या संस्थापक संचालिका असून त्यांनी चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात अभिनेता आणि निर्माता म्हणून लक्षणीय योगदान दिले आहे.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान नाम.उदय सामंत यांनी डॉ.नुतन माळी यांचे कौतुक करताना "महाराष्ट्रातील तरुणांसाठी आदर्श" असा उल्लेख करुन एका ग्रामीण भागातील विद्यार्थीनी पासून ते एक बहुआयामी उद्योजक आणि आरोग्य क्षेत्रातील नेतृत्व असा त्यांचा प्रवास राज्याच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या