फणसाड अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणीमित्र,नागरिकांच्या मार्फत पाणवठ्या वरील वन्यजीव गणना करण्यात आली. सदरच्या निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये एकूण 26 पर्यटक सहभागी झाले होते. सर्व सहभागी पुणे मुंबई मुरुड रोहा अलिबाग असे विविध ठिकाणावरून आले होते. सव्विस पर्यटक तसेच फणसाड अभयारण्यातील वनरक्षक, वनमजूर यांनी मिळून ८ मचाणीवर रात्रभर बसून वन्यजीव पाहणी केली. त्यामध्ये धरणाची गान, बांधतलाव केतकीची गान, चिखलगान भांडव्याचा माळ, चाक्याचा माळ, आंबेगान आणि विहुर धरण या ठिकाणी असलेल्या मचाण वर बसून प्राणीमित्रांनी मनसोक्त निसर्ग अनुभव लुटला !
रात्रभर पौर्णिमेच्या प्रकाशात पर्यटकांना विविध प्राणी पक्षी ह्यांचे दर्शन झाले. त्यामध्ये सहकुटुंब सहभागी असलेले अनिल कुदळे ह्यांना बिबट्याचे दर्शन झाले. बांधतलावावर पर्यटकांना साळिंदर दिसले तर केतकीची गान येथील पर्यटक सकाळी बेस कॅम्प सुपेगांव परत येत असताना महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू बघायला मिळाला. सोबतच पर्यटकांना भेकर,पांढरा उंदीर,रानडुक्कर, दिवड साप, चापडा साप( Bamboo Pit Viper), मश्या दिवड असे विविध प्राणी दिसले.
पक्षांमध्ये राखी धनेश तांबट समुद्र गरुड शिपाई बुलबुल कवडा सनबर्ड मोर पानकावडा श्यामा जंगली पिंगळा मलबार धनेश हळद्या दयाळ मोठा तांबट मच्छी घुबड रातवा रान कोंबडा शामा भारद्वाज हरियाल अशा विविध पक्षांचे दर्शन पर्यटकांना झाले.
या कार्यक्रमांमध्ये फणसाड वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे,वनपाल आदेश पोकळ, वनपाल हरिश्चंद्र नाईक यांनी स्वतः रात्रभर अभयारण्यात थांबून निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले होते.
फणसाड अभयारण्यातील निसर्गअनुभव एक अप्रतिम कार्यक्रम असून एक अनोखा अनुभव पर्यटकांना मिळण्याची उत्तम संधी आहे. पौर्णिमेच्या रात्रीचा लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेल्या फणसाड अभयारण्यातील रात्रीची जंगलातील आवाज ऐकणे हा एक अविस्मरीय अनुभव असल्याचे अनिल कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगून वनसेवक प्रदीप बागवे ह्यांनी दिलेली अप्रतिम माहिती ऐकून पुन्हा फणसाड अभयारण्यात येणार असल्याची भावना अनिल कुदळे यांनी व्यक्त केली.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या