कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)शासन निर्णयानुसार मुरुडच्या दरबार हॉलमध्ये तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच भाग दरबार हॉलमध्ये आयोजित शिबीराप्रसंगी तहसीलदार रोहन शिंदे, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, नायब तहसीलदार संजय तवर, महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी, महसूल सहाय्यक अधिकारी के.वाय.राठोड, मंडळ अधिकारी संतोष कचरे, तलाठी रेश्मा विरकुड, राहुल जाधव,सपना वायंडे, संगीता भाटकर, पूजा विरकुड यावेळी उपस्थित होत्या.
सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांना विविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, शेतकरी दाखले वाटप करण्यात येऊन,रेशनकार्ड संबंधित कामे, मोफत 7/12 वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, ॲग्रीस्टॅक योजना, इ. महसूल विभागाशी संबंधित विविध कामासंबंधी मार्गदर्शन व निराकरण करण्यात आले.मुरुड मंडळ सजातील मुरुड, आगरदांडा, सावली,वावडुंगी व आंबोली येथील लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या