कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)रायगड जिल्हाधिकारी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 21 मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्याने रायगडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि सभागृहासाठी 21 मे रोजी चे उपोषण 10 जूनला करणार. यासाठी तहसीलदार अलिबाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे यांनी परवानगी दिली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी डॉ. जयपाल पाटील यांनी दिली.
रायगडातील हजारो अनुसूचित जाती व जमातीच्या जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने सन 2006 ला साडेसात कोटी रुपये निधी दिला होता,त्याचे केलेले निकृष्ट बांधकाम व भूकंपग्रस्त झालेली इमारत आणि सभागृह ४ वर्षात खाली करून सामाजिक भवन व इतर सहा कार्यालय शहरात इतरत्र हलविल्याने महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपये भाड्याने जात आहेत, ते त्वरेने थांबले पाहिजेत. त्यावेळी असलेल्या समाज कल्याण सहआयुक्ताच्या चुकीने मुख्य महामार्गापासून अतिशय दूर याचे बांधकाम केल्याने येथे जाण्या येण्यासाठी खर्च होत असे. त्यांची पेन्शन थांबवावी. ही इमारत ज्या कंत्राटदाराने बांधली व याचे नियंत्रण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले त्याच्यावर कारवाई होणे, येथील होणारे सभागृह समाजाच्या युवक युवतींच्या लग्नकार्यास अल्प किमतीत मिळावे.जिल्ह्यातून अलिबाग येथे सरकारी कार्यालयाच्या कामकाजासाठी आलेल्यांना अल्पदरात निवासाची व्यवस्था व्हावी, समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबिरांचे आयोजन उपलब्ध व्हावे.मागील २ वर्षापासून निर्णयासाठी आडून बसलेल्या अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी आणि जुनी इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करावे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉ. जयपाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ मे रोजी निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी रायगड जिल्ह्यातील २५ डॉ.आंबेडकर प्रेमी जनतेने या मागणीसाठी साथ दिली होती याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्री यांना पाठविले होते.सध्या महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट व समाज कल्याण मंत्री नाम. संजय राठोड यांच्यामध्ये नाराजीचे सूर ऐकावयास मिळत असून या रायगड जिल्ह्याच्या कामाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे दिसते. रायगडातील अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय भवन व सभागृहाच्या आपत्ती निराकरणासाठी डॉ. जयपाल पाटील हे 10 जून पासून उपोषणास बसणार आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी सहभागी होऊन हा रायगड करांचा प्रश्न सोडवूया.असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी केले असून रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडेही निवेदन दिले असून तो हा प्रश्न तातडीने सोडवतील.अशी आशा त्यांनी व्यक्त केली अन्यथा पावसाळा जवळ आल्याने रायगड जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे 811ग्रामपंचायत येथील कार्यक्रम थांबवून या महत्त्वाच्या आपत्तीच्या मागे लागणार.असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या