दिपक सोनवणे यांच्या "६३ बेधडक" कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)काव्यप्रेमींच्या आणि साहित्यविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत, तरुण तडफदार कवी दिपक भिकन सोनवणे (कवीदिप) लिखित "६३ बेधडक" या दमदार कविता संग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर येथे उत्साहात पार पडला. पलपब प्रकाशन अहमदाबाद, गुजरात द्वारे प्रकाशित आणि पलपब साहित्य परिवार, पालघर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याने साहित्याच्या नव्या क्षितिजाला स्पर्श केला.
या कविता संग्रहाचा प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.निवृत्त पोलीस आयुक्त आणि ज्येष्ठकवी विनायकराव जाधव (सातारा), निवृत्त आदर्श शिक्षक सुरेश सावे (रा. ही. सावे विद्यालय, तारापूर), सोनोपंत दांडेकर कॉलेजचे प्राचार्य किरण सावे, ज्येष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर तसेच अहमदाबाद येथील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री रेखा दीक्षित यांच्या शुभहस्ते हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
या प्रसंगी घेण्यात आलेल्या "अभिजात काव्यधारा" या कविता स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल ५० कवी सहभागी झाले होते. या स्पर्धेमुळे नवोदित कवींना मंच मिळाला.उपस्थित मान्यवरांनी "६३ बेधडक" या कविता संग्रहाचे भरभरून कौतुक केले. कवीदिप यांची लेखणी समाजातील कटू वास्तव, भावनांचे नाजूक तरंग आणि विचारांना चालना देणाऱ्या विषयांना स्पर्श करणारी आहे असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले. त्यांचे लेखन हे केवळ कविता नसून समाजमनाला एक नवी दिशा देणारे विचारसंग्रह आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी विशेष उपस्थिती म्हणून पलपब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पवार, पालघर पलपब अध्यक्ष कवी लेखक सुहास राऊत, अभिनेत्री पर्निका राऊत व प्रज्ञा म्हात्रे, तसेच लेखक प्रकाश बारी, सुरेश पाचकवडे आणि डॉ. विनय दांदळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव जाधव आणि प्राचार्य किरण सावे यांनी उपस्थित कवी, लेखक आणि रसिक वाचकांना प्रेरणादायी संदेश दिला. "लिहिलेल्या साहित्याचे पुस्तक होऊ द्या आणि ते वाचकांपर्यंत पोहोचू द्या तसेच पुस्तके विकत घेऊन वाचा आणि संग्रही ठेवा" असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रकाशनाच्या आधीच शंभर पेक्षा अधिक प्रती वाचकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरून खरेदी केल्यामुळे "६३ बेधडक" हा संग्रह वाचकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि विक्रीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या