कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर) मुरुड मधील पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था ही नुकतीच शासनमान्य (रजि.)झाली असून इतिहासाची साक्ष देणा-या मुरुड मधील प्रसिद्ध पद्मदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होऊन याठिकाणी पर्यटक व शिवप्रेमींसाठी किल्ला सहज पाहता यावा.ही संस्थेची तळमळ असून यासाठी शासनाच्या संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष पुरवून याठिकाणी सुसज्ज जेट्टी बांधण्यात यावी.अशी मागणी पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांनी पद्मदुर्ग जागर सोहळ्याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात केली.
जागर पद्मदुर्ग चा : एक दिवस इतिहासाचा ! ही संकल्पना दूरदर्शन चे रायगड जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार स्व.दिपक शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झाली.रायगड-कोकणकडा मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने १६ वर्षांपूर्वी या किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.याचा उद्देश हाच होता कि,सिद्धीचा जंजिरा किल्ला बघण्यासाठी लाखों पर्यटक भेट देत असतात.परंतु ज्या सिद्धीला जरब बसवण्यासाठी श्री छत्रपती शिवरायांनी या पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली.कालवश हा किल्ला दुरावस्थेत राहिला.मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर येण्यासाठी कोकण कडा मित्र मंडळ व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार (महाड) व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समितीचे अध्यक्ष अशिल ठाकूर यांच्या पुढाकारातून या सोहळ्याला मुर्त स्वरूप प्राप्त झाले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित लावतात.यंदा या सोहळ्याचे १६ वे वर्ष आहे.या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते गड देवता पूजन,श्री.शिवप्रतिमा पूजन, व्याख्यान, मर्दानी खेळ,श्रींची पालखी मिरवणूक, श्री कोटेश्वरीदेवी पूजन, महाप्रसाद व गड स्वच्छता मोहीम शिवभक्त व शिवप्रेमींसाठी एक पर्वणीच असते !
भगवे फेटे परिधान केलेले अबालवृद्ध, जयभवानी जय शिवाजी असा जयघोष, फुलांनी सजलेला परिसर अशा प्रसन्न वातावरणात रविवारी १६वा पद्मदुर्ग जागर सोहळा पार पडला. पद्मदुर्ग जागर आणि गड संवर्धन संस्था मुरुड व कोकण कडा मित्रमंडळ रायगड सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थेने त्याचे आयोजन केले होते.
या पद्मदुर्ग जागर सोहळ्यासाठी पर्यटकांसह हजारो शिवप्रेमींनी पद्मदुर्ग किल्ल्यावर हजेरी लावली होती. सकाळी मुरुड राधाकृष्ण मंदिरापासून शिवपालखीला सुरुवात करण्यात आली. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय,जयभवानी,जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी त्यामुळे परिसर दणाणून गेला. ही पालखी नंतर खोरा बंदरापर्यंत आणण्यात आली. त्यानंतर,बोटीने पालखी पद्मदुर्ग किल्ल्यात आली.सुरुवातीला गड देवता द्वारपाल पूजन शेखर फरमन, कोकण कडा मित्र मंडळ अध्यक्ष सुरेश पवार, विजय वाणी, प्रमोद भायदे,रुपेश जामकर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर गणेश वरुण पूजन दुर्गराज रायगड येथील शिवराज्याभिषेक राजपुरोहित प्रकाश स्वामी काशिनाथ जंगम यांच्या वेद घोषात श्री छत्रपती शिवरायांची प्रतिमा व श्री कोटेश्वरीमाता अभिषेक -पूजन करण्यात आले.
पद्मदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी का बांधला ? या विषयावर प्रतिकजी कालगुडे -पाटील यांनी व्याख्यान केले.यावेळी पद्मदुर्ग जागर कार्यक्रमाचे औचित्य साधून मुरुडचा इतिहास सांगणारी दोन पुस्तके अनिकेत अशोक पाटील यांचे श्री. शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग व प्रितम सुरेश वाळंज यांचे मरूत्क्षेत्र ते मुरुड इतिहासाचा पुरातत्वीय मागोवा ही दोन ऐतिहासिक पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या मध्ये मुरुडची ओळख केवळ जंजिरा नसून मुरुडचा सुमारे दोन हजार वर्षांपासून ते आता पर्यंतचा प्रवास वर्णन केला आहे. त्याचबरोबर शिवछत्रपतीनी राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी म्हणून उभारलेल्या पद्मदुर्गाच्या उभारणी पासून ते जंजिरा संस्थान भारत देशात विलीन होण्या पर्यंत चा पद्मदुर्गाचा इतिहास वर्णन केला आहे.प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर या उपस्थित होत्या. पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती चे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्थेला शासकिय मान्यता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) धर्मदाय आयुक्त सुनील साळुंखे यांच्या हस्ते अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांना देण्यात आले.ही संस्था रजिस्टर झाली असून या किल्ल्याचा संवर्धनात होणारी विविध कामे या संस्थेमार्फत केली जावीत.अशी भावना अशिलकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या