कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील रोहा,श्रीवर्धन, पुण्याकडे जाणारा जवळचा असणाऱ्या राजपूरी -खोकरी रस्त्या दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा पावसाळ्यात कोसळल्याने रस्ता धोकादायक बनला असून या ठिकाणी तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व प्रवासी वर्गातून केली जात असताना पावसाळा सुरु झाला तरी कोणती दुरुस्ती करण्यात न आल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे राजपूरी -खोकरी दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा कोसळला असून संरक्षक कठडा बांधून मिळणे बाबत व योग्य ती उपाययोजना करण्यात संबंधित राजपूरी ग्रामपंचायतीतर्फे मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्यापही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना न करण्यात आल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता भिती व्यक्त केली जात आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता राजपुरी -खोकरी दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा बांधण्यात वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.परंतु अद्यापही या कामासाठी निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले होते.परंतु मे महिना उलटून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्यात न आल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या