शिवचरित्र सर्वाचा आदर, सन्मान करण्याची प्रेरणा देते-श्रीमंत कोकाटे
रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत पदयात्रा निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करताना श्री.कोकाटे यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, शौर्याचा इतिहास सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला. महत्त्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तोरणा किल्ला जिंकणे, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊसाहेबांचा सल्ला घेतला असेही श्री.कोकाटे यांनी सांगितले.
आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण शिवाजी महाराज कटाक्षाने राबवत असत. शिवरायांचे शेतकरी धोरण हे शेतकरीप्रधान होते. या सर्व बाबी त्यांच्या प्रागतिक विचारांच्या साक्षीदार आहेत. छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव, समता, संवेदनशीलता, मानवता, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये त्यांनी आदर्श घालून दिला आहे. शिवकाळात अत्याधुनिक साधने नसताना अशक्य कार्य त्यांनी शक्य करून दाखविले ते केवळ कर्तृत्वाच्या आणि प्रागतिक विचारांच्या बळावर असेही श्री.कोकाटे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या