अलिबाग दि.6- निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) रुही खान यांनी केले.
अलिबाग येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सभागृहात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप, आदर्श आचारसंहिता व खर्चाबाबत मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील, रोशन शिंदे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती खान यांनी सांगितले की
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे. निवडणूक प्रचार करतांना आयोगाच्या सुचनाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
निवडणूकीच्या प्रचाराकरीता एक खिडकी समितीकडून परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणीही परवानगीशिवाय प्रचार सभा, गाडयावरील रॅली इ. करू नये. कोणताही पक्ष किंवा उमेदवार, ज्यामुळे विद्यमान मतभेद विकोपास जातील किंवा परस्परात द्वेष निर्माण होईल किंवा भिन्नभिन्न जाती व समाज, धार्मिक वा भाषिक यांच्यामध्ये तणाव उत्पन्न होईल असे कोणतेही कार्य करणार नाही. एकमेंका सोबत भांडण-तंटे करू नये.
आर्दश आचारसंहितेचे सर्व नियम अटी पाळावेत.
मतदान शांततापूर्ण व सुव्यवस्थित रीतीने होत असल्याची आणि मतदारांना कोणताही उपद्रव न होता किंवा अडथळा न येता त्यांचा मताधिकार वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत असल्याची खातरजमा करण्यासाठी, मतदानाच्या कामावर असलेल्या अधिका-यांबरोबर सहकार्य करतील, त्यांच्या प्राधिकृत कार्यकत्यांना योग्य ते ओळखपत्रे द्यावी. मतदार वगळता, निवडणूक आयोगाकडून मिळालेला विधीग्राह्य पास ज्याच्याजवळ नाही अशी कोणतीही व्यक्ती मतदान मंडपात प्रवेश करणार नाही. मतदान पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपर्यंत पूर्ण होणाऱ्या ४८ तासांच्या कालावधीत जाहिर सभा घेण्यास मनाई असेल असेही श्रीमती खान यांनी सांगितले.
उमेदवारानी त्यांची दैंनदिन नोंदवही संपूर्ण प्रचार कार्यकाळात खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे, निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला, निर्वाचित उमेदवाराच्या निवडणूकीच्या तीस दिवसांच्या आत सादर कारावयाचा असतो. उमेदवारासांठी स्वतंत्र निवडणूक खर्च नोंदवही असणे आवश्यक आहे.
याबरोबरच उमेदवाराने घ्यावायची खबरदारी, परवानग्या अशा अनेक निवडणूकी संदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या